विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी

पंढरपुरातील दर्शन मंडप, दर्शन रांगेसाठी १२९ कोटींची तरतूद

मुंबई, दि. 24 : राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासाच्या सुमारे 305 कोटी 63 लाख रुपयांच्या आराखड्यांना आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्यस्तरीय शिखर समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. यात श्री क्षेत्र पंढरपूर येथील दर्शन मंडप व दर्शन रांग या सुविधेसाठी 129 कोटी 49 लाख रुपयांच्या कामांचाही समावेश आहे.

अर्थसंकल्पात तसेच वेळावेळी आश्वासित केल्याप्रमाणे राज्यातील तीर्थस्थळांच्या विकासासाठी भरीव निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यानुसार तीर्थस्थळ व पर्यटनस्थळांच्या विकासासाठी तातडीने नियोजन करण्यात यावे. तसेच सर्वच ठिकाणची कामे दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण व्हावीत याची काळजी घ्यावी, असे निर्देश मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी या बैठकीत दिले.

सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे झालेल्या या बैठकीस उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार समाधान अवताडे, आमदार सरोज अहिरे, मुख्य सचिव सुजाता सौनिक, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे, वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव ओ. पी. गुप्ता, नियोजन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजगोपाल देवरा, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव ब्रिजेश सिंह, ग्रामविकास विभागाचे सचिव एकनाथ डवले, पर्यटन विभागाच्या सचिव जयश्री भोज, सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, आदी उपस्थित होते. जळगांव, नाशिक आणि सातारा जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी दृकश्राव्य प्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले होते.

श्री क्षेत्र पंढरपूर विठ्ठल-रुक्मिणी मंदीर परिसरात भाविक आणि पर्यटकांसाठी दर्शन मंडप व दर्शन रांग सुविधा उभारण्यात येणार आहे. त्यासाठी 129 कोटी 49 लाख रुपयांच्या आराखड्यास मान्यता देण्यात आली. भगूर (जि. नाशिक) येथील स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जीवनावर आधारित थीमपार्क साकारण्यात येणार आहे. त्यासाठीच्या 40 कोटी रुपयांच्या प्रस्तावास तसेच पहिल्या टप्प्यातील 15 कोटी रुपयांच्या तरतुदीस मान्यता देण्यात आली. अमळनेर (जि. जळगांव)येथील देशातील एकमेवाद्वितीय अशा मंगळग्रह देवस्थानाच्या 25 कोटींच्या विकास आराखड्यास मान्यता देण्यात आली. सातारा जिल्ह्यातील कोयना जलाशय-मौजे मुनावळे येथील जलक्रीडा पर्यटन सुविधा (ता.जावळी, जि.सातारा)साठी 47 कोटी रुपयांच्या अतिरिक्त मागणीस मान्यता देण्यात आली. हे सर्व प्रस्ताव पर्यटन विभागाने सादर केले. त्याबाबत सविस्तर सादरीकरण व त्यातील प्रकल्प आणि सुविधांची माहिती सादर केली.

ग्रामविकास विभागाने सादर केलेल्या अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर येथील संत गाडगेबाबा यांची कर्मभूमी ऋणमोचन येथील 18 कोटींच्या विकास आराखड्यास मान्यता देण्यात आली. तसेच श्री क्षेत्र गहिनीनाथगड (जि. बीड) च्या विकास आराखड्यातील 2 कोटी 67 लाखांच्या कामांस मान्यता देण्यात आली. याशिवाय मुंबईवरील 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यात अजमल कसाब या सशस्त्र दहशतवाद्यास जीवंत पकडणाऱ्या शहीद तुकाराम ओंबळे यांच्या सातारा जिल्ह्यातील केंडबे (ता. जावळी) येथील मुळगांवी स्मारक उभारण्यासाठी 15 कोटी रुपयांच्या निधीच्या तरतुदीस बैठकीत मान्यता देण्यात आली.

याशिवाय नगर विकास विभागाने नागपूर शहरातील आराखडे सादर केले. त्यातील लक्ष्मीनारायण शिवमंदीर- नंदनवनच्या 24 कोटी 73 लाखांच्या विकास आराखड्यास, कुत्तेवालेबाबा मंदीर आश्रम-शांतीनगरसाठी 13 कोटी 35 लाख रुपये आणि  मुरलीधर मंदीर पारडी विकास आराखड्यासाठी 14 कोटी 39 लाख रुपयांच्या तरतूदीस मान्यता देण्यात आली.

पंढरपुरात भाविकांसाठी प्रशस्त दर्शन मंडप, स्कायवॉकसह दर्शन रांग

पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी नेहमीच भाविक येत असतात. आषाढी आणि कार्तिक वारीसाठी लाखो  वारकरी आणि भाविक पर्यटक पंढरपुरात येतात. त्यांच्यासाठी अद्ययावत असा दर्शन मंडप उभारण्यात येणार आहे. सुमारे 16 हजार चौरस मीटरच्या या मंडपात पहिल्या व दुसऱ्या मजल्यावर 6 हजार भाविकांची सोय करण्यात येईल. या सर्वांना वेळेनिहाय टोकन पद्धतीने प्रवेश देण्यात येईल. याशिवाय त्यांना स्कायवॉक पद्धतीची एक किलोमीटरची दर्शन रांगही असेल. या मंडप आणि दर्शन रांगेमुळे भाविकांना सुरक्षित, सुसह्य आणि सोयी-सुविधांनी युक्त अशी दर्शनाची सोय उपलब्ध होणार आहे. स्कायवॉक असल्याने स्थानिकांना दर्शन रांगेचा त्रास होणार नाही. तसेच भाविकांचा दर्शनासाठी लागणार वेळ कमी होणार आहे. मंडप आणि रांगेत पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, लिफ्ट, वैद्यकीय सुविधा उपलब्ध असणार आहेत. अन्नछत्राच्या माध्यमातून जेवण उपलब्ध करून दिले जाणार आहे. याठिकाणी भाविकांना कमीत कमी वेळेत दर्शन व्हावे यासाठी टोकन पद्धतीने प्रवेश दिला जाणार आहे. निश्चित केलेल्या वेळेतच त्यांना मंडप व रांगेत प्रवेश दिल्याने गर्दीचेही नियंत्रण होणार आहे. याशिवाय यामध्ये दिव्यांग व ज्येष्ठ नागरिक, मातांसाठी स्वतंत्र व्यवस्था केली जाणार आहे.

भगूरमध्ये साकारले जाणार वैशिष्ट्यपूर्ण असे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनावर आधारीत थीमपार्क भगूर हे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदार सावरकर यांचे जन्मस्थान आहे. याठिकाणी त्यांचा जीवनपट उलगडवून दाखवणारे स्मारक थीमपार्क रुपात साकारण्यात येणार आहे. सावरकर यांच्या निवासस्थानाच्या जवळच दोन हेक्टरवर हे थीमपार्क साकारण्यात येईल. याठिकाणी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनाचे, संघर्षाचे दर्शन घडवणारे कथाकथन, ऑडिओ-व्हिज्युअल्स, स्वातंत्र्यलढ्यासाठी जीवन समर्पित करण्याच्या त्यांच्या शपथेपासूनचा संपूर्ण जीवन प्रवास तसेच स्वातंत्र्यवीरांचे लेखन, इतर क्रांतीकारकांच्या भेटी, पन्नास वर्षांची शिक्षा, अंदमान तुरुंगातील वास्तव्य हे संग्रहालयाच्या माध्यमातून सादर केले जाणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *