कथक रंग – “शेड्स ऑफ कथक” : वैजयंती नृत्य अकॅडमीचा नृत्य सोहळा ठाण्यात उत्साहात संपन्न ठाणे, दि : रसिका रंजन सभा आयोजित नृत्य प्रतिभा नृत्य महोत्सवात वैजयंती नृत्य अकॅडमी तर्फे “कथक रंग – शेड्स ऑफ कथक” हा आकर्षक नृत्याविष्कार सादर करण्यात आला. नृत्यालंकार सौ. स्नेहल जांभेकर यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या कार्यक्रमात गुरु आणि शिष्यांनी कथकनृत्याच्या विविध रंगांची देखणी गुंफण सादर केली.

कार्यक्रमाची सुरुवात गणेश आणि सरस्वती वंदनेने झाली. वरिष्ठ शिष्यांनी सादर केलेल्या थाटाने वातावरणात सौंदर्य आणि शिस्त यांचा संगम घडविला. त्यानंतर गुरु सौ. स्नेहल जांभेकर यांनी स्वतः तीनतालावर आमद, तोडा, परन, तत्कार आणि कवित्त अश्या अप्रतिम नृत्यदृश्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली.लहान शिष्यांनी हातांच्या विविध मुद्रा आणि त्यांचे अर्थ सांगणारे ‘हस्तमुद्रा’ हे सादरीकरण अत्यंत मोहकपणे सादर केले. गुरु सौ.स्नेहल जांभेकर यांनी आपल्या गुरु डॉ. मंजिरी श्रीराम देव यांच्या नृत्यरचनेंतून साकारलेली ठुमरी – राधा-कृष्णांच्या दैवी प्रेमाची भावपूर्ण अभिव्यक्ती – प्रेक्षकांच्या मनाला भावली.

कार्यक्रमाचा उत्कर्षबिंदू म्हणजे तालमणी पं. मुकुंदराज देव यांच्या संगीतावर आधारित दशावतार नृत्यनाट्य होय. गुरु व सर्व शिष्यांनी एकत्र येऊन सादर केलेल्या या नृत्याने संध्याकाळी भक्ती आणि ऊर्जा यांचा सुरेल मिलाफ घडविला. या प्रसंगी रसिका रंजन सभाच्या विश्वस्त मंडळाने सौ. स्नेहल जांभेकर यांना “नाट्यरत्न” हा सन्मान आणि त्यांच्या शिष्यांना “युवा रसिका सितारा” हा मानद पुरस्कार प्रदान केला.

वैजयंती नृत्य अकॅडमीने या सन्मानाबद्दल आणि प्रोत्साहनाबद्दल रसिका रंजन सभा यांच्या विश्वस्त व व्यवस्थापन समितीचे मनःपूर्वक आभार मानले. सादरकर्त्यांमध्ये गुरु सौ. स्नेहल जांभेकर, स्मिता अय्यर, वर्षा नायक, शालिनी राय, विद्या शेटकर, प्राची डांडेकर, अवनी अय्यर, अनिका माथुर, अनन्या आव्हाड, स्वरा नाबर आणि प्रचिती देशपांडे यांचा समावेश होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *