श्री विठ्ठलाच्या भव्य मूर्तीेचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले अनावरणपुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घाट, उपवन येथे झाला सोहळापरिवहन मंत्री प्रताप सरनाईक, खासदार नरेश म्हस्के यांची उपस्थिती ठाणे : सावळ्या विठ्ठलाच्या या भव्य मूर्तीमुळे हा परिसर आणखी पवित्र झाला असून ठाण्याला प्रति पंढरीचे रूप प्राप्त झाले असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घाट, उपवन येथील श्री विठ्ठलाच्या भव्य मूर्तीेच्या अनावरण सोहळ्य़ात केले.उपवन तलाव परिसरात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घाट तयार झाला. तिथे आता ही सगळ्यात मोठी विठ्ठल मूर्ती साकारली आहे. साक्षात पांडुरंग इथे आलेला आहे, असेही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. या सोहळ्यास, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, खासदार नरेश म्हस्के, माजी आमदार रवींद्र फाटक, माजी महापौर एच. एस. पाटील, निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर), माजी नगरसेवक परिषा सरनाईक, विहंग सरनाईक, पूर्वेश सरनाईक, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपनगर अभियंता सुधीर गायकवाड, कार्यकारी अभियंता संजय कदम आदी उपस्थित होते. महाराष्ट्रामध्ये मी अनेक उद्घाटन लोकार्पण भूमिपूजन केली. अडीच वर्षात, मुख्यमंत्री असताना अनेक लोकाभिमुख प्रकल्प पुढे नेले. लोकाभिमुख कल्याणकारी योजनाही केल्या. परंतु, आजचा सोहळा आतापर्यंत झालेल्या सगळ्या कार्यक्रमांमध्ये आगळावेगळा असा सोहळा आहे, असेही उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले.महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आहे. ही शिवरायांची, वीरांची आणि संतांची भूमी आहे. वारकरी संप्रदाय फार मोठी एक शक्ती या महाराष्ट्रामध्ये आहे. म्हणून मुख्यमंत्री असताना वारकरी दिंड्यांना अनुदान सुरू केले. असे अनुदान देणारे पहिला आपले पाहिले सरकार. वारकऱ्यांचा विमा काढण्याचा निर्णय घेतला. दिंड्या टोल फ्री केल्या, असेही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.गोरगरिबांच्या या देवाची मूर्ती उभी करू अशी विनंती केली आणि ती त्यावेळी मुख्यमंत्री असलेल्या एकनाथ शिंदे यांनी मान्य केली. त्यातून आजचा हा सोहळा शक्य झाला. अशा एकूण चार भव्य मूर्ती आहेत. त्यापैकी एक राम मंदिर तलाव येथे तर उर्वरित दोन मीरा भाईंदर मध्ये होणार आहेत, असे याप्रसंगी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले.या सोहळ्यानंतर, निवृत्ती महाराज इंदुरीकर यांचे कीर्तन झाले.ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील उपवन तलावाच्या परिसरात विविध विकास कामे करण्यासाठी राज्य शासनाकडून महानगरपालिका क्षेत्रात मुलभूत सोयीसुविधांचा विकास या अंतर्गत निधी उपलब्ध झाला आहे. त्यात, ५१ फुटांची भव्य श्री विठ्ठल मूर्ती उभारण्यात आली आहे. त्याचे मूर्तीकार, कोल्हापूरचे सतीश घारगे आहेत. या मूर्तीसह, दगडी पायवाट, सुशोभीकरण, विठ्ठल मुर्ती मागील भिंत, रस्त्याच्या बाजूची संरक्षक भिंत आदी कामे करण्यात आली आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *