ठाणे : ठाण्यात वाहतुक कोंडीची मोठी समस्या निर्माण झाल्याने मंगळवारी पत्रकार परिषद घेत मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी शनिवारी लाँग मार्च काढण्याची घोषणा केली आहे. या मार्चमध्ये सर्व सामाजिक संस्था, गृहसंकुलातील नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन अविनाश जाधव यांनी केले.
ठाण्यात मागील काही दिवसांपासून वाहतुक कोंडीची समस्या मोठ्याप्रमाणात निर्माण झाली आहे. या विषयावर मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन हा इशारा दिला. आमच्याकडून रस्त्यासाठी कर घेतात. मग वाहन तर रस्त्याकडेला पार्क केले तर कारवाई का केली जाते. आम्हाला व्यवस्थापन पुरविण्याचे काम सरकारचे आहे. पार्किंची उत्तम व्यवस्था का नाही केली. महापालिकेने वाहने उभी करण्यासाठी गावदेवी येथे वाहन तळ बांधले. परंतु तेथेही पे-अँड पार्क धोरण आहे. महापालिकेने मोफत वाहनतळ उभे केले नाही. भिवंडीहून ठाण्यात पोहचण्यासाठी अडीच ते तीन तास लागतात. वसईहून ठाण्यात पोहचण्यासाठी चार ते साडे चार तास लागतात. ठाण्यात वाहतुक कोंडीची अत्यंत वाईट समस्या आहे असे जाधव म्हणाले.

