उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते अमरावती शहर आणि परिसरातील १४२० कोटी रूपयांच्या विविध विकासकामांचे लोकार्पण व भूमिपूजन

अमरावती शहर आणि परिसराच्या विकासासाठी भरघोस निधी देण्यात आला आहे. यातून शहराच्या वैभवात भर पडणाऱ्या पायाभूत सुविधा निर्माण होतील. एकाच दिवशी 1420 कोटी रूपयांच्या कामांचे लोकार्पण आणि भूमिपूजन करण्यात आले आहे. ही कामे दर्जेदार होण्यासाठी सर्वांनी योगदान द्यावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

जिल्हा नियोजन सभागृहात आज विविध विकासकामांचे लोकार्पण आणि भूमिपूजन करण्यात आले. यावेळी आमदार सुलभा खोडके, विभागीय आयुक्त डॉ. निधि पाण्डेय, जिल्हाधिकारी सौरभ कटियार, मुख्‍य कार्यकारी अधिकारी संजिता मोहपात्रा, अतिरिक्त जिल्हाधिकारी सुरज वाघमारे, मुख्य अभियंता गिरीश जोशी, महापालिका आयुक्त सचिन कलंत्रे, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता रुपा गिरासे आदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले, शासनाला उत्पन्न देणाऱ्या विभागांकडून मोठ्या प्रमाणावर कर गोळा करण्यात येत आहे. या विभागांना चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी पायाभूत सुविधा निर्माण करण्यात येत आहेत. विकासकामे करताना पुढील काळाचा विचार ठेवण्यात आला आहे. सारथी संस्थेमध्ये 300 आसन क्षमतेचे श्रोतागृह मंजूर आहे. मात्र याठिकाणी 500 विद्यार्थ्यांच्या राहण्याची सोय राहणार आहे. त्यामुळे राज्यातील सर्व सारथीच्या ठिकाणी आता 500 क्षमतेचे श्रोतागृह राहणार आहे. यासाठी लागणारा अतिरिक्त निधीही देण्यात येणार आहे. एकाच दिवशी 1420 कोटी रूपयांच्या विविध कामांचे लोकार्पण, भूमिपूजन करण्यात आले आहे. या सुविधांचा नागरिकांना लाभ होऊन त्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होणार आहे.

अमरावती महापालिकेकडून वाढीव दराने कर आकारणी केली आहे. त्यामुळे तात्काळ सॉफ्टवेअरमध्ये दुरूस्ती करून नागरिकांना करपावत्या देण्यात याव्यात. कोणत्याही परिस्थितीत ऑक्टोबरपर्यंत ही कार्यवाही पूर्ण करण्यात यावी, असे निर्देश दिले.  सर्व घटकांचा विकास होण्यासाठी शासन विविध योजना राबवित आहे. त्याचा भाग म्हणून मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना, मुलींना मोफत शिक्षण, बारावीनंतर विद्यावेतन, शेतकऱ्यांना मोफत वीज, दुधाला अनुदान, तीन गॅस सिलेंडर मोफत देण्यात येत आहे.

सारथी, बार्टी सारख्या संस्था उभारून अध्ययनासाठी पोषक वातावरण निर्माण करण्यात येत आहे. त्यासोबतच विभागीय स्तरावर चांगल्या क्रीडा सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. या सुविधांचा खेळाडूंनी लाभ घ्यावा. खाशबा जाधव यांच्यानंतर यावर्षी राज्यातील खेळाडूने वैयक्तिक पदक प्राप्त केले आहे. खेळाडूंना तंत्रशुद्ध प्रशिक्षण मिळाल्यास भविष्यात पदक मिळवणारे खेळाडू राज्यातून तयार होतील, यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. विभागीय, जिल्हा आणि तालुका क्रीडा संकुलासाठी निधी वाढवून देण्यात आला आहे. त्यामुळे या क्रीडा सुविधा प्राधान्याने उभ्या राहतील.

अमरावती येथील पाणी पुरवठ्याची अमृत योजना, सारथीचे विभागीय कार्यालय, वसतिगृह, अभ्यासिका, लालखडी रेल्वे उड्डाणपूल, चांगापूर फाटा रस्ता, विभागीय क्रीडा संकुल मैदानाचे भूमिपूजन तर जिल्हा स्त्री रूग्णालयाच्या इमारतीचे लोकार्पण करण्यात आले आहे. त्यासोबतच वस्तू व सेवा कर इमारतीचे नूतनीकरण, विदर्भ ज्ञान विज्ञान संस्थेतील क्रीडा सुविधा, उत्पादन शुल्कच्या इमारतीचे उद्घाटन, वडाळी उद्यान सौंदर्यीकरणाचे उद्घाटन करण्यात आले, तसेच नगरोत्थान अभियानातील कामांचे ऑनलाईन भूमिपूजन करण्यात आले.

क्षिप्रा मानकर यांनी सूत्रसंचालन केले. उपजिल्हाधिकारी विवेक जाधव यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *