डॉ वरदा गोडबोले यांच्या ‘रागसंगीत विवेचन’ कार्यक्रमाला ठाणेकरांचा उदंड प्रतिसाद
नुकताच ठाण्यातील सहयोग मंदिर घंटाळी येथे नामवंत शास्त्रीय गायिका डॉ. वरदा गोडबोले यांचा ‘रागसंगीत विवेचन’ हा कार्यक्रम रसिक श्रोत्यांच्या भरघोस उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी त्यांना संवादिनी आणि तबला याची साथ संगत अनुक्रमे डॉ. दिलीप गायतोंडे व श्री. भूषण परचुरे यांनी केली.
‘रागसंगीत विवेचन’ या कार्यक्रमातील पहिले पुष्प यावेळी सादर करण्यात आले. यासाठीचा राग होता राग शुद्ध कल्याण. कार्यक्रमाच्या सुरुवातीला किराणा घराण्याचा अतिशय सुप्रसिद्ध ख्याल ‘हो तुम बीन कौन’ आणि त्याला जोडून ‘मोंदर बाजो रे’ ही बंदिश संपूर्ण रागविस्तारासहित अप्रतिमरित्या सादर करण्यात आली. पंडित भातखंडे रचित एक लक्षणगीत ‘गावो सब सुजान’ सादर करून त्यानंतर वरदा ताईंनी रागाचा उहापोह केला. यासोबत विविध पैलू उलगडणाऱ्या एकूण आठ बंदिशी सादर झाल्या. या सादरीकरणात वेळोवेळी महत्त्वाच्या मुद्द्यांचे विवेचन केले गेले. त्याचबरोबर शुद्ध कल्याण रागाच्या आसपासचे भूप देशकार हे राग सुद्धा राग तत्वाच्या आधारे शुद्ध कल्याण पेक्षा कसे वेगळे आहेत याबद्दल मार्गदर्शन केले.
ज्याप्रमाणे शास्त्रीय संगीताचे साधक, अभ्यासक, विद्यार्थी यांसाठी हे विवेचन अतिशय मोलाचे ठरले त्याचप्रमाणे सामान्य श्रोत्यांना कानसेन होण्याच्या दृष्टीने सुद्धा हे विवेचन अतिशय महत्त्वाचे आणि रंजक पद्धतीचे होते. कै. मोरेश्वर गजानन धारप स्मृतिप्रीत्यर्थ, श्री. प्रथमेश गोडबोले निर्मित ‘रागसंगीत विवेचन’ या मालिकेचा शुभारंभ शनिवार दिनांक २१ सप्टेंबर रोजी संध्याकाळी पाच वाजता सादर करण्यात आला होता. तर अशाच विविध रागांवर आधारित कार्यक्रमांची मालिका यापुढे सादर होणार आहे. प्रत्येक कार्यक्रमात एक राग असे अनेक राग श्रोत्यांसमोर उलगडून दाखवण्याचा डॉ वरदा गोडबोले यांचा मानस आहे.