गेल्या अनेक दिवसांपासून कांद्याचे दर चढत असून ६० ते ८० रुपये भावाने निकृष्ट दर्जाचा कांदा विकला जात आहे. त्यामुळे गृहिणींचे आर्थिक गणित कोलमडून त्या रडवेल्या झाल्या आहेत. अशावेळी आमदार संजय केळकर यांच्या उपक्रमाने ठाणेकर महिलांना दिलासा मिळत असून उत्तम दर्जाचा कांदा अवघ्या अर्ध्या किमतीत म्हणजे ३५ रुपये किलो दराने मिळू लागला आहे.
कांद्याचे उत्पादन कमी झाल्याने तसेच पावसामुळे कांद्याची आवक कमी झाली आहे. त्यामुळे किरकोळ बाजारातही निकृष्ट दर्जाचा कांदा ६० ते ८० रुपये किलोने विकला जात आहे. कांद्याचे दर चढू लागल्याने महिलांच्या डोळ्यात पाणी येऊ लागले आहे, मात्र नाईलाजाने त्यांना हे कांदे खरेदी करावे लागत आहेत. या पार्श्वभूमीवर आमदार संजय केळकर पुन्हा एकदा ठाणेकरांसाठी धाऊन आले आहेत. ते अध्यक्ष असलेल्या संस्कार संस्थेच्या माध्यमातून आणि केंद्र सरकारच्या एनसीसीएफ या राष्ट्रीय ग्राहक फोरमच्या सहकार्याने ठाण्यात उत्तम दर्जाचा कांदा अवघ्या ३५ रुपये किलोने उपलब्ध करून देण्यात आला आहे. प्रत्येकी पाच किलो कांदे फक्त १७५ रुपये किलोने देण्यात येत आहे.
ठाण्यात सध्या चार ठिकाणी विक्री केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. लवकरच आणखी केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत. आज पहिल्या दिवशी १५ टन उत्तम दर्जाचा कांदा उपलब्ध झाला असून ना नफा ना तोटा या तत्त्वावर विकला जात आहे. त्यामुळे विविधा केंद्रांवर महिलांच्या उड्या पडू लागल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार गुरुवारी पहिल्याच दिवशी चंदनवाडी येथे चार हजारहून अधिक महिलांनी तर विष्णूनगर येथील केंद्रावर दीड हजारहून जास्त महिलांनी या उपक्रमाचा लाभ घेतला.
जसजसा कांदा उपलब्ध होईल तसतशी विक्री केंद्रे वाढवण्यात येणार आहेत. शनिवारी केंद्रांची संख्या वाढणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली. या उपक्रमामुळे महिलांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. उत्तम दर्जाचा कांदा अर्ध्या किमतीत मिळत असल्याने त्यांचे स्वयंपाकघरातील बिघडलेले बजेट रुळावर येणार असल्याने त्यांनी आमदार संजय केळकर यांचे आभार मानले आहेत.
आमदार संजय केळकर यांच्या माध्यमातून आंबा महोत्सव आणि अनेक ठिकाणी शेतकरी आठवडा बाजार दरवर्षी आयोजित करण्यात येतो. या उपक्रमाव्दारे शेतकरी उत्पादक आणि सर्वसामान्य नागरिक यांची थेट भेट होत असल्याने नागरिकांना उत्तम प्रतीचा भाजीपाला, हापूस आंबे वाजवी दरात मिळतात. या व्यवहारात दलाल नसल्याने दोन्ही घटकांना फायदा होतो. या उपक्रमांबरोबरच आता ना नफा ना तोटा या तत्त्वावर कांदा विक्री करण्यात येत आहे. त्यामुळे ठाणेकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.
शुभारंभ कार्यक्रमात आमदार संजय केळकर यांच्यासह भाजपा जिल्हा अध्यक्ष संजय वाघुले, ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे, माजी उप महापौर सुभाष काळे, ठाणे परिवहन सदस्य विकास पाटील, डॉ. राजेश मढवी, महेश कदम, राजेश ठाकरे, संतोष साळुंखे, प्रिया कदम, स्नेहा इपते, प्रियंका शिलकर, सुरेश लोकरे, ओम दास, विशाखा कणकोसे आदी उपस्थित होते.